
प्रतिनिधी:सत्यजीत रणवरे (BMTमराठी)
१२ जानेवारी राष्ट्रीय युवा दिन म्हणजेच स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने श्री वर्धमान विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील ६ वी चा विद्यार्थी मयुरेश ज्ञानदेव मेटकरी याने इंटरनॅशनल योगा बुक ऑफ रेकॉर्ड साठी तब्बल २ तास ३१ मिनिटे मकरासन (क्रोकोडाइल पोज) हे आसन करून नवीन इतिहास रचून आंतरराष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे.
या विक्रमाची नोंद इंटरनॅशनल योगा बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये घेतली जाणार आहे. याने रिचा कुंभाकर, छत्तीसगड येथील २२ वर्षीय तरुणीचा दोन तास मकरासन करण्याचा विक्रम मोडून या बारा वर्षीय बालकाने आंतरराष्ट्रीय विक्रमाला गवसनी घातली आहे.
मयुरेश हा गरीब शेतकरी कुटुंबातील असून हुशार व नम्र विद्यार्थी आहे. लहानपणापासूनच मयुरेशला योगासन करण्याची आवड व प्रेरणा त्याच्या वडिलांकडून मिळालेली आहे. या विक्रमासाठी त्याने गेले काही महिने अथक परिश्रम व कठोर सराव करून यश संपादित केले आहे. हे यश संपादित करण्यासाठी वडील ज्ञानदेव मेटकरी यांचा सिंहाचा वाटा असून प्राचार्य हनुमंत कुंभार यांच्या कल्पनेतून व विशेष प्रयत्नातून मयुरेशला व्यासपीठ उपलब्ध झाले.तसेच शाळा समिती अध्यक्ष मकरंद वाघ, उपाध्यक्ष प्रशांत महामुनी, उप मुख्याध्यापक अरुण निकम, उपप्राचार्य रामनाथ नाकाडे, पर्यवेक्षक शिवप्रसाद कुलकर्णी, पर्यवेक्षक अनिल उबाळे, भारत चिल्ड्रेन अकादमी चे प्राचार्य कृष्णदेव क्षीरसागर, वर्गशिक्षक सुरज मोरे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. क्रीडा शिक्षक नितीन कुलकर्णी व किसवे सर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन तर सूत्रसंचालन पंकज पाटील यांनी केले.
या कार्यक्रम प्रसंगी नामदार दत्तामामा भरणे (कॅबिनेट मंत्री- क्रीडा,अल्पसंख्याक व युवकल्याण विभाग) हे उपस्थित होते. त्यांनी या आंतरराष्ट्रीय विक्रमासाठी मयुरेशला शुभेच्छा दिल्या व उपस्थित विद्यार्थ्यांना मयुरेशचा आदर्श व प्रेरणा घेऊन शैक्षणिक व विशेष करून क्रीडा विभागात दैदिप्यमान कामगिरी करावी असे आवाहन केले. मयुरेशने श्री वर्धमान विद्यालयाचे व इंदापूर तालुक्याचे नाव आंतरराष्ट्रीय विक्रम संपादित करून जगभर पसरवले याचा सार्थ अभिमान आहे असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमासाठी इंदापूर तालुक्याचे गटविकास अधिकारी सचिन खुडे, लासुर्णे प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रज्ञा लोंढे, अस्थिरोगतज्ञ डॉक्टर नितीन लोंढे, टाईम कीपर म्हणून क्रीडा शिक्षक अरविंद देठे, विजयसिंह पाटील, क्रीडा शिक्षिका ए यु रणवरे, योगाचार्य रवींद्र वेदपाठक व विशेष गॅझेटेड अधिकारी दत्तात्रय बिडकर-वरिष्ठ अभियंता,विक्रम सारभाई स्पेस सेंटर केरळ,योगाचार्य पांडुरंग चव्हाण, कळंब ग्रामपंचायत चे सरपंच विद्या सावंत व सदस्य इक्बाल शेख, वालचंदनगर ग्रामपंचायत सदस्य अंबादास शेळके, हर्षवर्धन गायकवाड, वैशाली शिवशरण व ग्रामस्थ, पाठशाळा व विद्यालयाचे शिक्षकवृंद, मयुरेशचे कुटुंबीय, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.