हर्षवर्धन पाटील पुन्हा भाजप मध्ये जाणार !

Spread the love

संपादकीय : सत्यजीत रणवरे

महायुती कडून विधानसभेची उमेदवारी मिळणार नसल्याचे लक्षात येताच तसेच राज्यात महाविकास आघाडीच्या बाजुने निवडणुकीचे वातावरण असल्याचे पाहून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उडी मारली होती.सुरुवाती पासूनच महाविकास आघाडी व त्यात हि शरद पवारांसाठी अनुकूल असलेल्या वातावरणाचा कानोसा घेत हर्षवर्धन पाटील यांनी पुत्र व कन्या प्रेमापोटी कार्यकर्त्यांचा आग्रह म्हणत भारतीय जनता पक्षाला रामराम करत शरद पवारांची तुतारी फुंकली.

सख्खे शेजारी पक्के… असल्या सारखे राजकारणाची जवळपास पन्नासहून अधिक वर्षे एकमेकांना विरोध करत काढणारे पवार-पाटील घराणे यावेळी एकत्र दिसले अर्थातच यात हर्षवर्धन पाटलांना अडसर असलेले धाकटे पवार सोबत नव्हते धाकट्या पवारांनी काकांची राष्ट्रवादी आमचीच असल्याचे म्हणत तिच्यावर कब्जा मिळवला होता.थोरल्या पवारांनी आपल्या संघटन कौशल्य, बुध्दी चातुर्य व राजकीय अनुभवाची शिदोरी कंबरेला बांधून लोकसभेच मैदान अगदी ८० च्या स्ट्रायक रेटने मारल्यामुळे विधानसभेला जय्यत तयारी केली होती.इंदापुरची जागा थोरल्या पवारांच हॅलीकॅप्टर सांगता सभेला उतरल कि आपणच मिळवली या स्वप्नरंजक इतिहासात पाटील देखील रमुन गेले होते.

पाटलांच्या सांगता सभेला पवारांच हॅलीकॅप्टर इंदापूरात उतरल हि परंतु शांत झोपलेल्या पाटलांना कार्यकर्ते अशी हवा घालत होते कि हॅलीकॅप्टरच्या रंजक स्वप्नात पाटील निपचित पडून राहिले आणी तिकडे मामांनी कधी डाव मारला हे कळले देखील नाही.जवळपास आठरा हजारांच मताधिक्य घेत मामांनी हॅलीकॅप्टरचा इतिहास मोडत पाटलांची स्वप्नरंजक झोप मोड केली.

भारतीय जनता पक्षाने दिलेल्या राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष पद मिरवत आज हि पाटील फडणवीस आणि शहां सोबत सलोखा राखुन आहेत.तर विधानसभे नंतर थोरल्या पवारांचा वाढदिवस वगळता माहाविकास आघाडीच्या व शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात इतरत्र पाटील तितकेसे दिसलेच नाहीत.उलट दर्शनी‌ महायुतीचे सरकार स्थापन होऊन देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर हर्षवर्धन पाटलांनी तिंघांन सोबतचे जुने वेगवेगळे फोटो प्रसारीत करीत तिघांना शुभेच्छा दिल्या.हि महाराष्ट्राची राजकीय संस्कृती म्हटल तर ठिक आहे पण मग याच सार्वजनिक प्रसार माध्यमांमध्ये प्रदर्शन आवश्यक होते का हा देखील प्रश्नच आहे.

सध्या प्रसार माध्यमांमध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या कडून शहा ,फडणवीस व पर्यायाने पुन्हा भारतीय जनता पक्षा सोबत जवळीक वाढवली जात‌ असल्याचेच दिसून येत आहे.त्यामुळे पुढील काळात राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष पद कायम राखत पाटील भाजपला मी पुन्हा येईन…असं तर म्हणत नसावेत ना असा प्रश्न निर्माण होतोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *